नेहमी विचारले जाणारे प्रश्न

इथे दिली जात असलेली माहिती ही आम्ही विविध विश्वसनीय संस्थांच्या संकेतस्थळांवरून एकत्रित केली आहे. यामध्ये वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन, द युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेनशन, द मॅसेच्युसेटस स्टेट डिपार्टमेंट आॅफ पब्लिक हेल्थ, द मिनिस्ट्री आॅफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, भारत सरकार, द बोस्टन पब्लिक हेल्थ कमिशन आणि क्लिव्हलँड क्लिनिक या आणि अशा ख्यातीप्राप्त संकेतस्थळांचा समावेश आहे. यांतील काही माहिती या संकेतस्थळांवरून शब्दश: घेतलेली आहे, तर काही ठिकाणी ती वेगळ्या पद्धतीने लिहिली गेलेली आहे.  या सर्व संस्थांनी आणि संकेतस्थळांनी या माहितीचे संकलन, लेखन आणि संपादन यांसाठी घेतलेल्या मेहनतीचा, परिश्रमांचा आम्ही येथे साभार निर्देश करतो.

महत्त्वाच्या संज्ञा:

WHO  – वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन

CDC:  – द युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेनशन

COVID-19  याआधी मानवामध्ये कधीही न आढळलेल्या novel  (म्हणजे नवीन) अशा कोरोना विषाणूमुळे पसरणारा COVID-19 हा नवा आजार आहे. श्वसनमार्गावरील भागात संसगार्ने सौम्य स्वरूपाचा प्रादुर्भाव घडवून आणणारे अनेक प्रकारचे कोरोना विषाणू मानवी शरीरात आढळतात. त्यामुळे श्वासनलिका, सायनस, घशाचा वरचा भाग, स्वरयंत्रात असलेली कंठातील पोकळी अशा ठिकाणी या विषाणूंचा संसर्ग होऊन किरकोळ स्वरूपाचा आजार होतो. कोवीड-१९ या शब्दात CO ही अक्षरे कोरोना या शब्दाचे लघुरूप आहेत, VI म्हणजे व्हायरस किंवा विषाणू, D म्हणजे डिसीज किंवा आजार आणि 19  हा आकडा २०१९ या वर्षाचा  निर्देश करतो.

 

कोवीड-१९ चा फैलाव कसा होतो?

ज्या व्यक्तींना या विषाणूचा संसर्ग झालेला आहे, अशा व्यक्तींच्या सान्निध्यात येण्याने या संसगार्चा फैलाव होतो. कोवीड-१९ चा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाका-तोंडातून उडणारे तुषार आणि त्यांतील छोटेछोटे थेंब या विषाणूचा फैलाव करतात. हे थेंब त्या व्यक्तीच्या निकटच्या, नेहमीच्या वापराच्या वस्तूंवर, जमिनीवर पडतात. या वस्तूंना, पृष्ठभागांना अन्य निरोगी व्यक्तीचा स्पर्श झाला आणि असा स्पर्श झालेले हात त्या व्यक्तीने आपल्या डोळ्यांना, नाकाला, तोंडाला लावले; की त्या व्यक्तीला कोवीड-१९चा संसर्ग होतो.  संसर्ग झालेल्या व्यक्तीची शिंक, खोकला, खाकरणं, जोराचा श्वासोच्छ्‌वास यांतून उडालेले सूक्ष्म तुषार आणि त्यामधले अतिसूक्ष्म थेंब अन्य व्यक्तींच्या श्वासमागार्ने शरीरात गेले, तरीही हा संर्स्ग होतो. म्हणूनच संसर्ग झालेल्या व्य्क्तीपासून किमान तीन ते सहा फूट किंवा किमान एक ते दोन मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. सामाजिक विलगीकरण ( सोशल डिस्टन्सिंग ) महत्त्वाचे आहे, ते म्हणूनच!

 

कोवीड-१९चा संसर्ग झाल्याची लक्षणे कोणती आहेत?

ताप, खोकला, कफ आणि श्वास घ्यायला त्रास होणे ही कोवीड-१९च्या संसगार्ची मुख्य लक्षणे आहेत. या संसगार्ने आजारी असलेल्या व्यक्तीला कमालीचा अशक्तपणा,अंगदुखी, वेदना, नाक-छाती चोंदणे, घसा खवखवणे किंवा अतिसार यांसारखी लक्षणेही जाणवू शकतात. मात्र कोवीड-१९चा संसर्ग झालेल्या काही व्यक्तींना आजाराची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. विशेष कोणतीही काळजी न घेताही यांतील काही व्यक्ती संसर्गमुक्त होऊ शकतात. मात्र काही लोकांचे दुखणे वेगाने बळावते आणि त्यांना श्वास घ्यायला कमालीचा त्रास / वेदना होतात.

 

मी आजारी आहे, असे मला वाटत असेल, तर मी काय करावे?

आपण कोवीड-१९ विषाणूच्या संपर्कात आलो आहोत आणि त्यामुळे आपल्याला तापासारखी लक्षणे जाणवत आहेत, खोकला लागला आहे, कफ जाणवतो आहे किंवा श्वास घ्यायला त्रास होतो आहे, असे तुम्हांला वाटत असेल, तर तुमच्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क करून त्यांचा सल्ला घ्या. तुम्ही आजारी असलात तर तुम्ही घर-बंद राहणे आणि इतरांच्या संपर्कात न येणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. अशा स्व-विलगीकरणात राहून अनेक व्यक्ती यातून बऱ्या होऊ शकतात; मात्र आणिबाणीची  परिस्थिती उद्‌भवली, तर तुम्हांला वैद्यकीय मदत तत्काळ मिळणे गरजेचे आहे, हे लक्षात ठेवा.

कोवीड-१९च्या संसगार्ची लक्षणे जाणवत असल्यामुळे तुम्ही डॉक्टरांकडे / दवाखान्यात जात असाल, तर जाण्यापूर्वी संबंधितांना तशी स्पष्ट कल्पना द्या. म्हणजे तुमची तपासणी करणारे डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय सहकारी संसगार्पासून स्वत:ची काळजी घेण्याची पूर्वतयारी करू शकतील.

 

ज्या व्यक्तीला संसर्ग झाला असल्याची काहीही लक्षणे नाहीत, अशा व्यक्तीकडून कोवीड-१९चा फैलाव होऊ शकतो का?

ज्यांना संसर्ग झाला असल्याची लक्षणे स्पष्ट दिसत आहेत, अशा आजारी अथवा लक्षणे-दिसणाऱ्या (सिम्प्टोमॅटिक) व्यक्तींकडून कोवीड-१९ च्या फैलावाची शक्यता सर्वाधिक असते. कारण संसर्ग झालेल्या व्य्क्तीच्या शिंका, खोकला आणि खाकरण्यावेळी उडणाऱ्या सूक्ष्म तुषारांमधून या विषाणूचा फैलाव मुख्यत: होतो. मात्र एखाद्या व्यक्तमध्ये संसर्गाची  कोणतीही लक्षणे दिसण्यापूर्वीच त्या व्यक्तीद्वारे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. ज्यांच्यामध्ये संसर्गाची  कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, अशा व्य्क्तींनाही सामाजिक विलगीकरणाचा ( सोशल डिस्टन्सिंग) सल्ला म्हणूनच देण्यात येत आहे.

कोवीड-१९च्या संसगार्मुळे  गंभीर, गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होण्याचा सर्वाधिक धोका कुणाला आहे?

– सर्व वयोगटांचे लोक कोवीड-१९च्या संसर्गाची  शिकार होऊ शकतात. मात्र या संसगार्नंतर आधीच विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या प्रौढ व्यक्तींच्या प्रकृतीमध्ये बिघाड होऊन जीवावरची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. यामध्ये हृदयविकार, मधुमेह, फुप्फुसांचे विकारा असलेल्या व्यक्तींचा प्राधान्याने समावेश होतो. याचा अर्थ इतर व्यक्ती गंभीररीत्या आजारी पडणार नाहीत, किंवा त्यांच्या जीवाला धोका नाही, असे नाही. संसर्गाचा  धोका सर्वांनाच आहे. काहींना तो इतरांपेक्षा जास्त आहे, एवढेच!

 

सोशल डिस्टन्सिंग किंवा सामाजिक विलगीकरण म्हणजे काय? ते कसे करायचे?

कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी दोन व्यक्तींमध्ये किमान ३ ते ६ फूट किंवा १ ते २ मिटर एवढे अंतर राखणे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग किंवा सामाजिक विलगीकरण होय. या काळात कोणत्याही स्वरूपाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणे, टॅक्सी अगर राईड-शेअर यांसारख्या  सहप्रवासी असलेल्या सेवांमधून प्रवास करणे हे कटाक्षाने टाळायचे असते. शॉपिंग सेंटर्स, मॉल, भाजी मंडई, शाळा, सिनेमा-नाटकाची थिएटर्स, मंदिर-मशीद-चर्च-सायनागॉग आदि सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे अशी सर्व गर्दीची  ठिकाणे टाळणे, अशा ठिकाणी कुणीही गर्दी न करणे, एकमेकांच्या निकट न जाणे; म्हणजे सोशल डिस्टन्सिंग किंवा सामाजिक विलगीकरण.

 

कोवीड-१९च्या संसगार्पासून पूर्ण बचावासाठी माझ्या  कुटुंबाने कोणती काळजी घेतली पाहिजे?

व्यक्तिगत स्वच्छता आणि सामाजिक विलगीकरणासह रोजच्या रोज सर्व प्रकारची काळजी सतत घेणे आणि तुमच्या कुटुंबातल्या सर्वांना ही काळजी घ्यायला लावणे ही पहिली महत्त्वाची गोष्ट. घरातील वयस्कर व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि आधीच कोणत्या ना कोणत्या शारीरिक व्याधीनी ग्रस्त असणारे कुटुंबीय यांनी / यांच्यासाठी अधिक काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

१. संसर्ग झालेल्या, आजारी व्यक्तींशी निकट संपर्क टाळा.

२. तुम्ही स्वत: आजारी असाल, तर तातडीच्या वैद्यकीय मदतीखेरीज अन्य कोणत्याही कारणाने, कोणत्याही वेळी घराबाहेर पडू नका.

३. खोकला आला अगर शिंक आली, तर अशा वेळी तुमचे तोंड बाहीच्या आतल्या भागाने झाका अगर टिश्यू पेपर / रुमाल वापरा. हा टिश्यू पेपर नंतर नष्ट करा. रुमाल स्वच्छ धुवा.

४. तुमचे हात सतत आणि स्वच्छ धुवा.

नाक शिंकरणे, खोकणे, शिंकणे, लघवी अगर शौचाला जाणे या प्रत्येक वेळी.. तसेच स्वयंपाक करण्याआधी आणि काहीही खाण्या आधी तुमचे दोन्ही हात साबण लावून किमान वीस सेकंद परस्परांवर घासा आणि पाण्याने स्वच्छ धुवा.

साबण आणि पाणी नसेल, तर ज्यात किमान ६०% अल्कोहोलचे प्रमाण आहे, अशा सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ करा.

हात अस्वच्छ असतील तर साबण लावूनच स्वच्छ धुवा.

५. तुमच्या घरातला फोन, प्रत्येकाचे मोबाईल फोन्स, टेबल, स्वयंपाकाचा ओटा, विजेची अन्य उपकरणे आणि बटणे, दरवाजाच्या मुठी, कड्या, कोयंडे, कपाटांची हॅण्डल्स.. ज्या ज्या ठिकाणी घरातल्या व्यक्ती सतत स्पर्श करतात, ते-ते सर्व पृष्ठभाग स्वच्छ असतील आणि जंतुनाशक द्रावणाने पुसलेले असतील अशी काळजी घ्या.

 

 कोवीड-१९ या विषाणूचा फैलाव अन्नपदार्थांमधून होऊ शकतो का?

सर्व प्रकारचे कोरोना विषाणू हे संसर्गित व्यक्तीच्या श्वसनमागार्तून बाहेर पडणाऱ्या तुषारांमधून पसरतात, असे आजवरचे संशोधन सांगते. कोवीड-१९ या विषाणूचा फैलाव अन्नपदार्थांमधून होऊ शकतो, असे सिद्ध करणारे कोणतेही संशोधन अगर पुरेसा पुरावा आत्ता उपलब्ध नाही. अन्न तयार करणे आणि खाणे या दोन्ही कृतींच्या आधी तुमचे हात किमान वीस सेकंद साबणाच्या फेसात चोळून स्वच्छ धुणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे तुमच्या अन्नाची सुरक्षितता निश्चित होईल. नाक शिंकरणे, खोकणे, शिंकणे, लघवी अगर शौचाला जाणे या प्रत्येक वेळी सतत हात धुण्याची सवय लावा.

ज्या पृष्ठभागावर कोवीड-१९ विषाणू आहे, अशा पृष्ठभागाला लागलेला हात नाक, डोळे अगर तोंड यांच्याजवळ नेल्यास संसर्ग होण्याची शक्यता आहे. मात्र संसगार्चा फैलाव होण्याचा हा प्रमुख अगर एकमेव मार्ग नाही.

एखाद्या पृष्ठभागावर पडलेला कोरोना विषाणू तिथे दीर्घकाळ जिवंत राहण्याची शक्यता फारशी नाही. त्यामुळे अन्नपदार्थांमधून संसर्गाचा  फैलाव होणे, किंवा सरासरी तापमानातल्या-शीतकरण केलेल्या पुरवठा साखळीतून काही दिवस प्रवास करत आलेली पाकिटे, बॉक्सेस यांच्याद्वारे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता अगदीच अंधूक आहे.

 

ज्या ठिकाणी कोवीड-१९ चा फैलाव झालेला आहे, अशा शहरातून / ठिकाणाहून आलेले पाकीट स्वीकारणे, हाताळणे हे सुरक्षीत आहे का?

हो. कोवीड-१९चा संसर्ग झालेली व्यक्ती ते पाकीट अगर खोक्यातील वस्तू / कागद / साहित्याला संसर्गित करेल, ही शक्यता फारच धूसर आहे. ही अशी पाकीटे, पार्सले वेगवेगळी परिस्थिती आणि वेगवेगळ्या तापमानातून काही दिवस प्रवास करत पुरवठा साखळ्यांमधून पुढेपुढे पाठवली जात असतात; त्यामुळे या पार्सलांच्या पृष्ठभागावरून कोवीड-१९चा संसर्ग पसरण्याची शक्यता अगदीच धूसर आहे. मात्र अन्य व्यक्तींनी हाताळलेल्या वस्तू हाताळल्यानंतर तुम्ही तुमचे हात साबणाने स्वच्छ चोळून किमान वीस सेकंद पाण्याने धुणे अनिवार्य आहे.

 

कोवीड-१९चा संसर्ग झाल्याने ज्या व्यक्तीला विलगीकरणात (क्वारंटाईन) ठेवलेले आहे, अशा व्यक्तीमुळे अन्य व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो का?

व्यक्तीला अगर व्यक्तींच्या समूहाला विलगीकरणात (क्व्वारंटाईन) ठेवणे म्हणजे ज्या व्यक्ती संसर्गाच्या शक्यतेमध्ये आलेल्या आहेत अशा व्यक्तींना जे लोक संसर्गाच्या नजीक/ शक्यतेत आलेले नाहीत अशांपासून वेगळे करणे/ठेवणे. संसर्गाचा फैलाव रोखणे हा विलगीकरणाचा मुख्य उद्देश आहे.  कोवीड-१९ सारख्या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये साधारणत: चौदा दिवसांच्या काळात संसर्गाची  लक्षणे दिसू लागतात.  जी व्यक्ती संसर्गाच्या शक्यतेत आलेली आहे, अशा व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही त्यामुळेच किमान चौदा दिवसांच्या विलगीकरणात राहणे सक्तीचे असते. या काळात संबंधित व्यक्तींना संसर्ग झालेला असल्यास त्या त्यांच्या निकटच्या व्यक्तींमध्येही या संसर्गाची  लागण करू शकतात. विलगीकरणाचा हा काळ पूर्ण झाल्यावर मात्र संबंधित व्यक्तीला संसर्ग झाला असण्याची शक्यता मावळते आणि तिच्यापासून इतरांना होऊ शकणाऱ्या संसर्गाची  शक्यताही बहुतांशी संपुष्टात येते.

 

कोवीड-१९ साठी काही उपाय, औषध अगर लस आहे का?

सध्यातरी नाही. कोवीड-१९चा प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही लस अगर संसर्ग झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी औषध अजूनतरी उपलब्ध नाही. या संसर्गामुळे  प्रकृती ढासळलेल्या रुग्णांनी वैद्यकीय मदत तत्काळ घेणे, रुग्णालयामध्ये दाखल होणे महत्त्वाचे आहे. हा संसर्ग झालेले बरेच रुग्ण त्यातून बरे होऊ शकतात.

जगभरच्या प्रयोगशाळांमधून आणि संशोधनसंस्थांमधून कोवीड-१९साठी प्रतिबंधक लस आणि औषधे तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यात खात्रीलायक यश येण्यासाठी किमान १२ ते १८ महिन्यांचा काळ लागू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावरची विस्तृत माहिती वाचा:

बोस्टन पब्लिक हेल्थ कमीशन – Boston Public Health Commission

क्लिव्हलंड क्लिनिक – Cleveland Clinic

सीडीसी : महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे – CDC FAQs

सीडीसी : कोवीड-१९ कसा पसरतो – CDC How it Spreads

सीडीसी : गर्भावस्था आणि स्तनपान- ?- CDC Pregnancy and Breastfeeding

मॅसेच्युसेट्स डिपार्टमेन्ट आॅफ पब्लिक हेल्थ- Massachusetts Department of Public Health

आरोग्य मंत्रालय, भारत सरकार- Ministry of Health and Family Welfare, Government of India

वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन- World Health Organization (WHO) FAQs

सीडीसी : लक्षणेCDC Symptom Description and Symptom Checker


इस जानकारी को हार्वर्ड चैन स्कूल ऑफ़ पब्लिक हेल्थ और दाना-फ़ार्बर कैंसर इंस्टीट्यूट (DFCI) के विश्वनाथ लैब ने दाना-फ़ार्बर / हार्वर्ड कैंसर सेंटर (DF/HCC) के हेल्थ कम्युनिकेशन कोर की मदद से क्यूरेट किया है। ये हार्वर्ड चैन या DFCI के आधिकारिक विचार नहीं हैं। किसी भी प्रश्न, टिप्पणी या सुझाव के लिए rpinnamaneni@hsph.harvard.edu को इ-मेल करें।